Ad will apear here
Next
अजून त्या झुडुपांच्या मागे...
कविवर्य वसंत बापट यांचा २५ जुलै हा जन्मदिन. त्या निमित्ताने ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज ‘अजून त्या झुडुपांच्या मागे...’ या त्यांच्या कवितेबद्दल...
............
आकाशवाणी पुणे केंद्राचा ‘महक’ कार्यक्रम खूप लोकप्रिय होता. प्रत्येक उद्घोषकाची खासियत त्यातून प्रकट व्हायची. ‘महक’ कार्यक्रमाचे काही भाग मीसुद्धा सादर केले. एका ‘महक’चा दरवळ श्रोत्यांपर्यंत घेऊन जाण्यासाठी मी विषय निवडला होता विविध फुलांचा. म्हणजे ज्या कवितांमध्ये, गीतांमध्ये फुलांचा उल्लेख आहे अशी गीतं निवडली. अर्थात हा विषय निवडताना ज्ञानेश्वरमाऊलींचा मोगरा भक्तिभावानं दरवळत होताच... नंतर माणिक वर्मांच्या आवाजातला शुभ्रकेशरी पारिजात टपटपला आणि नंतर कवी वसंत बापट यांची सदाफुली खुदकन हसली. त्यांच्या या कवितेत सदाफुलीबरोबर शेवंती, चंपक, मोगराही गुंफलेला. आज पुन्हा ती सदाफुली आठवली. कारण आज कविवर्य वसंत बापट यांचा जन्मदिन. दशरथ पुजारी यांनी स्वरबद्ध केलेली आणि गायलेली बापट यांची सुरेख रचना अजूनही आठवते.

अजून त्या झुडुपांच्या मागे सदाफुली दोघांना हसते।
अजून अपुल्या आठवणींनी शेवंती लजवंती होते...

वसंत बापटकिती सुंदर ही कविता! प्रेमभावनेनं आणि कवीच्या सौंदर्यदृष्टीनं नटलेली!! ही कविता ऐकता ऐकता प्रत्येक रसिक गुणगुणायला लागतो, मग त्याचं नातं ‘सा रे ग म’शी असो किंवा नसो. शब्दांनी घातलेली साद रसिक मनाला भिडतेच. हो, म्हणून तर भावसंगीताची ही समृद्ध दुनिया प्रत्येकानं काळजात जपून ठेवलीय. कवी आणि संगीतकाराचं एकपण निर्माण झालं की जन्माला येतं सुरेख गाणं! मग त्या गाण्यावर कित्येक पिढ्या आनंदाच्या धनी होतात. हे धन ज्यांनी रसिकांना अर्पण केलं त्या कवीला, संगीतकाराला आणि गायक कलाकारांना कृतज्ञतेचा सलाम करावा असं सदैव वाटत राहतं.

विश्वनाथ उर्फ वसंत बापट सातारा जिल्ह्यातील कराड गावी जन्मलेले आणि आपल्या अफाट काव्यसंपदेने अवघ्या महाराष्ट्राचे झालेले. अध्यापक, स्वातंत्र्यसैनिक, शाहीर आणि सामाजिक बांधिलकीची पुरेपूर जाणीव ठेऊन सौंदर्यवादी प्रेरणेनं झपाटलेला कवी म्हणजे वसंत बापट! राष्ट्र सेवादलाचे प्रमुख, ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक म्हणूनही त्यांनी काम केलं. विशेष म्हणजे त्यांनी विंदा करंदीकर आणि मंगेश पाडगावकर यांच्याबरोबर काव्यवाचनाचे कार्यक्रम गावोगावी केले. काव्यवाचन हे कवींसाठी आणि रसिकांसाठी कशी आनंदाची पर्वणी ठरतं, याचं उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिलं. काव्यवाचनामुळं कविता रसिकांपर्यंत थेट पोहोचते. काव्यवाचन ही एक कला आहे. ही कला अवगत असणारे ‘वसंत बापट’ हे कवी अवघ्या महाराष्ट्राला परिचित होते. बेचाळीसच्या लढ्यात सक्रिय सहभागाबरोबरच आपल्या लेखणीची ताकद त्यांनी स्फूर्तिगीतांमधून दाखवली आहे. भूमिगत चळवळीत असताना त्यांनी लिहिलेल्या कवितांबरोबरच स्फूर्तिगीतं आजही शाळांमधून सादर होत असतात. 

शिंग फुंकले रणी वाजतात चौघडे
सज्ज व्हा उठा उठा सैन्य चालले पुढे।
किंवा
सदैव सैनिका पुढेच जायचे
न मागुति तुवा कधी फिरायचे।

अशी ही समरगीतं भारतीय सैनिकांना सद्यपरिस्थितीला तोंड देतानाही स्फूर्ती देणारी आहेत. १९६२च्या भारत-चीन युद्धात वसंत बापट यांनी लिहिलेली कविता आजही प्रेरणादायी आहे.

उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू
अभिमान धरू, बलिदान करू, ध्वज उंच उंच चढवू।।

स्फूर्तिगीतं असोत, प्रवासवर्णन असो, व्यक्तिचित्रण असो किंवा बालसाहित्य आणि समीक्षा असो, वसंत बापट यांनी विपुल लेखन केलं. बिजली, सेतू, अकरावी दिशा, सकीना, मानसी, तेजसी, राजसी असे त्यांचे कवितासंग्रह लोकप्रिय आहेत. त्यांनी लिहिलेली आणि यशवंत देव यांनी स्वरबद्ध केलेली अष्टविनायक गीतं गणेशोत्सवात हमखास वाजतात. याबरोबरच महाराष्ट्रातील आकाशवाणी केंद्रांवरून भक्तिसंगीताच्या कार्यक्रमांतूनही प्रसारित होत असतात. ‘उंबरठा’ या चित्रपटातील ‘गगन सदन तेजोमय...’ ही लतादीदींच्या स्वरातली प्रार्थना मनाचा गाभारा उजळून टाकणारी, तर ‘चांद मातला मातला...’ ही रचना एका वेगळ्याच उत्कट पौर्णिमेचा अनुभव देणारी... निसर्गप्रतिमांच्या रूपातून प्रकटणारी प्रणयभावना हे वसंत बापट यांच्या प्रेमकवितांचं वैशिष्ट्य! ‘सेतू’ कवितेतील शरदाची पहाट कोण विसरेल?
दिसली ही अन् विस्फारित मम झाले नेत्र
स्पर्शाने या पुलकित झाले गात्र नि गात्र
ही शारदातील पहाट... की... ती तेंव्हाची तू?
तुझिया माझ्यामध्ये पहाटच झाली सेतू ।

उमलतं यौवन आणि प्रेमभावनेची बेहोशी व्यक्त करणाऱ्या कविता वाचताना कवी वसंत बापट यांची अफाट प्रतिभाशक्ती, शब्दवैभव, नाट्यमयता आणि प्रेमाकडे पाहण्याचा विशुद्ध दृष्टिकोन जाणवतो. प्रेमानुभवाची आणि मीलनाची धुंदी, मनमोकळा शृंगार आणि प्रेयसीच्या हुरहूर लावणाऱ्या आठवणींमध्ये कवीचं मन रमतं. अवतीभवतीचा निसर्ग आणि विविध फुलांचे विभ्रम त्याच्या कवितेमधून आपल्याला दिसतात. ‘अजून त्या झुडुपांच्या मागे...’ या कवितेतल्या या ओळी पाहा... 

तसे पहाया तुला मला ग अजून दवबिंदू थरथरतो
अर्ध्यामुर्ध्या कानगुजास्तव अजून ताठर चंपक झुरतो...

दशरथ पुजारी (फोटो : आठवणीतली गाणी)हसणारी सदाफुली, झुरणारा चंपक अर्थात चाफा, थरथरणारा दवबिंदू, धुंद करणारा मोगरा संगीतकार आणि गायक दशरथ पुजारी यांनाही मोह घालत होता... आठवणींमध्ये रमणं हा रसिकमनाचा स्थायीभाव. दशरथ पुजारी यांनाही या कवितेनं असाच स्मृतींचा सुगंध दिला... त्यांनी अलगदपणे आपल्या सुरांच्या रेशीमधाग्यात त्यांना गुंफलं... त्या कवितेचं सुरेख भावगीत झालं... दशरथ पुजारी यांनी या भावगीताबद्दल म्हटलं आहे, ‘अजून त्या झुडुपांच्या मागे, सदाफुली दोघांना हसते... इतके चांगले शब्द मिळाल्यावर त्याला चांगली चाल सुचली नाही तरच नवल! ते गाणं मी खूप वेळा गायलोय. त्याचं रेकॉर्डिंग पण माझ्याच आवाजात झालंय. हे गाणं म्हणजे माझं ओळखपत्र आहे!’

खरंच किती सार्थ आहेत हे उद्गार! कवी वसंत बापट यांचं ‘अजून त्या झुडुपांच्या मागे...’ हे गीत ऐकताना कवी बा. सी. मर्ढेकरांच्या ओळीही हमखास आठवतातच

अजून येतो वास फुलांना
अजून माती लाल चमकते
खुरट्या बुंध्यावरी चढून
अजून बकरी पाला खाते...

कवी मर्ढेकर आणि कवी वसंत बापट यांच्या मनातील ‘अजून’ या शब्दाचे संदर्भ वेगळे आहेत. तरीही का कुणास ठाऊक मानवी मनाचं जुन्या संदर्भाभोवती घोटाळणारं मन मात्र एक आहे असं वाटत राहतं. आशावादी मन मोठं विलक्षण असतं... मीलनोत्सुक मनाची आशा तर असीम, अनिर्बंध. म्हणून तर कवी वसंत बापट यांच्या या कवितेच्या शेवटच्या कडव्यातली ओळ अजूनही आवर्जून आठवते. 

अजून फिक्कट चंद्राखाली माझी आशा तरळत आहे...’

किती खरं आहे ना हे सगळं! अजून जोपर्यंत आशा आहे, अजून आठवणी आहेत आणि अजून अशी भावमधुर गाणी आहेत तोपर्यंत रसिकांना स्वरानंदाची पर्वणी आहे.

आज वसंत बापट यांचा जन्मदिन साजरा करताना हसरी सदाफुली, लजवंती शेवंती आणि प्रणयभावनेनं धुंद करणारा मोगरा अनुभवण्यासाठी गुणगुणत राहू या यमनकल्याण रागात बांधलेली दशरथ पुजारी यांच्या हळव्या स्वरांनी मोहरलेली ही कविता...

अजून त्या झुडुपांच्या मागे सदाफुली दोघांना हसते
अजून अपुल्या आठवणींनी शेवंती लजवंती होते...

- डॉ. प्रतिमा जगताप
संपर्क : ९४२२२ ९२३८४

(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्रातून वरिष्ठ उद्घोषिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत.)

(कविता... स्वरांनी मोहरलेल्या या सदरातील लेखांचे पुस्तक आणि ई-बुक प्रसिद्ध करण्यात आले असून, ते बुकगंगा डॉट कॉमवर उपलब्ध आहे.)





 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZCWBE
 'अजुनच' हे गाणं आवडायला लागलं !! मस्तच !!1
 Kavyakshetrateel vasant rutu,vasant bapat...bhaktigeeta bhavgeetanpasun povadyanparyanta vaividhyapoorna kavya karnara kavi..ya lekhatun vasant bapat yanchya karakeerdicha surel gof vinla gela..lekhika dr.jagtap yancha manahpoorvak abhinandan1
 Superb2
 प्रतिमाताई,माझ्या खूप आवडीच्या गीतांमधील हे एक भावस्पर्शी गीत!बापट व पुजारी यांची ही कामगिरी लाजवाब!सरस्वतीही खुष झाली असणार!1
 Apratim... pratimatai.. Mananiy vasant bapatanchi sundar kavypratima rasikansamor ubhi kelit1
 सुरेख !सदर2
 Avit godi asnari lajawab bhavgit
Karnmadhur
Similar Posts
मृदुल करांनी छेडित तारा... सुमन कल्याणपूर नावाचे शांत, सोज्वळ, सुशील आणि सुमधुर स्वर आणि रमेश अणावकर नावाचे, नेमकी भावना व्यक्त करणारे नि सुरांशी जुळवून घेणारे शब्द.... अवतीभवतीचा कोलाहल विसरायला लावणारी शक्ती या शब्द-सुरांपाशी असते. सुमन कल्याणपूर यांचा ८३वा वाढदिवस २८ जानेवारीला झाला, तर आज, ३० जानेवारीला रमेश अणावकर यांचा १६वा स्मृतिदिन आहे
घाल घाल पिंगा वाऱ्या... अत्यंत तरल भावकविता लिहिणारे कवी कृ. ब. निकुंब यांचा आज, नऊ ऑगस्ट रोजी जन्मदिन आहे. त्या निमित्ताने, ‘कविता स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज ‘घाल घाल पिंगा वाऱ्या...’ या त्यांनी लिहिलेल्या हृदयस्पर्शी कवितेबद्दल...
फिरुनी नवी जन्मेन मी... वैविध्यपूर्ण गाणी गाणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा आठ सप्टेंबर हा जन्मदिवस नुकताच होऊन गेला. त्या निमित्ताने, ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज पाहू या ‘फिरुनी नवी जन्मेन मी’ ही सुधीर मोघे यांची सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली आणि आशाताईंच्या स्वरांनी सजलेली कविता ...
मी गाताना गीत तुला लडिवाळा... वास्तवतेचे चटके सोसूनही मन निबर होऊ न देता संवेदनशीलता ज्यांनी जपली त्या कविवर्य ना. धों. महानोरांचा १६ सप्टेंबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज पाहू ‘एक होता विदूषक’ या चित्रपटातील त्यांच्या ‘मी गाताना गीत तुला लडिवाळा’ या अंगाईबद्दल...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language